यशस्वी सौर ऊर्जा प्रकल्प… अंभोरा

अन्न, पाणी, निवारा या मूलभूत गरजांसोबतच आता वीज ही सुद्धा मूलभूत गरज झाली आहे. एक तासभर जरी वीज नसली तरी सगळे व्यवहार ठप्प होताना दिसतात. त्यामुळेच विजेचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वापराच्या तुलनेत वीज निर्मिती कमी असल्यामुळेच भारनियमन अपरिहार्य होत आहे. विशेषत: उन्हाळ्याच्या दिवसात विजेच्या संकटाला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागते. याला उत्तम पर्याय म्हणून सौर ऊर्जा पुढे येत आहे. घरगुती साधनांसाठी सौर उर्जेचा वापर वाढताना दिसतो. असाच एक यशस्वी प्रयोग चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्रात करण्यात आला आहे.

अंभोरा येथे उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पातून ५ मेगावॅट वीज निर्मिती यशस्वीपणे करण्यात येत आहे. जवाहरलाल नेहरु नॅशनल सोलर मिशनच्या माध्यमातून ऊर्जानगर परिसरातील अंभोरा येथे महाजनकोने सौर उर्जेचे तीन प्रकल्प उभारले आहेत. थिनफिल्म पद्धतीचे दोन तर क्रिस्टल लाईन पद्धतीचा एक प्रकल्प अशा तीनही प्रकल्पातून दररोज पाच मेगावॅट वीज निर्मिती होते. पारंपरिक वीज निर्मितीला उत्तम पर्याय म्हणून अपारंपरिक ऊर्जा मोठ्या प्रमाणात समोर येत आहे, त्याचे हे अतिशय उत्तम उदाहरण आहे.

वीस हेक्टर जागेत या तीनही प्रकल्पांची निर्मिती करण्यात आली आहे. हा राज्यातील पहिला मोठा प्रकल्प मानला जातो. थिनफिल्म पद्धतीच्या प्रकल्पातून तीन मेगावॅट तर क्रिस्टल लाईन पद्धतीच्या प्रकल्पातून दोन मेगावॅट वीज निर्मिती होते. याचे वैशिष्ट्य म्हणजे हा प्रकल्प इकोफ्रेंडली असून प्रदूषण विरहित आहे. २०१० साली अंभोरा येथे पहिला सौर ऊर्जा प्रकल्प स्थापन झाला व मार्च २०१२ मध्ये उर्वरित दोन प्रकल्प उभारण्यात आले. एक मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारायला तेव्हा १२.०५ कोटी रुपये खर्च आला. या प्रकल्पातून आजही वीज निर्मिती उत्कृष्टरित्या सुरु आहे.

सौर ऊर्जा ही डीसी स्वरुपात प्राप्त होते. इन्हर्टरच्या माध्यमातून डीसीचे एसीमध्ये रुपांतर केले जाते व त्यानंतरच ती वापरासाठी योग्य असते. १ मेगावॅट थिनफिल्म प्रकल्पास १२ हजार २८८ पॅनल लागतात. एका पॅनलमधून ९२.५ व्होल्ट ऊर्जा संकलित केली जाते. त्याव्दारे १.१७ म्पिअर करंट उत्पादन होतो म्हणजे ८४ वॅट वीज निर्माण होते, असा हा तांत्रिक हिशोब आहे. ही वीज महाजनको विकत घेऊन ग्राहकांना वितरित करते. पर्यावरण पूरक प्रकल्प असल्यामुळे या प्रकल्पाला प्रोत्साहन निधी प्राप्त होतो. विशेष म्हणजे एकदा उभारल्यानंतर या प्रकल्पाला देखभाली व्यतिरिक्त कोणताही खर्च येत नाही.

देशातील एकूण विजेचा विचार केल्यास देशामध्ये एकूण १ लाख ४६ हजार ७५३ मेगावॅट वीज निर्मिती होते. त्यापैकी ५४ टक्के कोळशावर आधारित असून २५ टक्के हायड्रो पद्धतीची आहे. तर केवळ ८ टक्के सौर ऊर्जा निर्मिती होते. उर्वरित वीज निर्मिती वायू व अनुशक्ती आधारित आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती होत असतानासुद्धा विजेची टंचाई भासतेच. सौर उर्जेचा प्रयोग यशस्वी होत असताना याकडे वीज निर्मितीचे स्त्रोत म्हणून पाहणे गरजेचे ठरत आहे. चंद्रपूर येथील प्रकल्प यशस्वी झाला आहे. त्याप्रमाणे अनेक खाजगी संस्था सुद्धा सौर ऊर्जा निर्मितीकडे वळताना दिसत आहेत. पारंपरिक वीज निर्मितीला पर्याय म्हणून भविष्यात सौर ऊर्जा निर्मितीला प्राधान्य देणे गरजेचे ठरणार आहे.

लेखक : रवी गिते
स्त्रोत : जनशक्ती

Comments

Popular posts from this blog

सौर बंब (सोलर वॉटर हिटर ) - शंकासमाधान

सौर पथदिवे

सौर ऊर्जा