कोट्टापल्लयममध्ये झाला मध्यरात्री सूर्योदय!

लोकहितासाठी ज्याचा आदर्श भारतातील गावे व खेडी घेऊ शकतात असे गाव म्हणजे कोट्टापल्लयम्.

एक स्वयंसेवी संस्था, एक खासगी संस्था आणि स्थानिक तसेच राज्यसरकारच्या सहकार्यातून हे साध्य झाले आहे.
मुरूगम्मा कोईम्बतूरला गेल्या होत्या आणि रात्रीच्या शेवटच्या बसने त्या कोट्टापल्लयमला परतल्या. त्यांनी घाईघाईतच घराची वाट धरली. घरी पोहोचल्यावर त्यांनी आपल्या दहा वर्षांच्या मुलीला सार्वजनिक नळावरून पाणी आणण्यास सांगितले. आणि त्यांना जाणवले की अवघ्या तीन वर्षांपूर्वी कोट्टापल्लयममध्ये हे शक्य नव्हते.
कोट्टापल्लयम तसे स्वच्छ व टापटीप गाव. या गावातील मरुगम्मांच्या घरासहित ५० घरे स्वच्छ पण कच्च्या रस्त्याने जोडली गेली आहेत. ही घरे छोटीशीच आहेत पण सुबक आहेत, मजबूत आहेत आणि जास्तीत जास्त जागा वापरता येईल अशा पद्धतीने बांधली आहेत. घरांच्या भिंती पांढर्‍याशुभ्र आहेत तर छप्पर लाल कौलांनी शाकारले आहे. कोट्टापल्लयम हे वाविपल्लयम ग्रामपंचायतीमध्ये येणार्‍या दहा वाड्यांपैकी एक असून तामिळनाडूमधील कोईम्बतूर किंवा कोवाई (स्थानिक भाषेप्रमाणे) या दुसर्‍या सर्वात मोठ्या शहरापासून अवघ्या दीड तासाच्या अंतरावर आहे.
२००४ साली कोट्टापल्लयम दिवसा मुबलक सूर्यप्रकाशात न्हाऊन निघे आणि रात्री मात्र मिट्ट अंधारात गुडूप होऊन जाई. तामिळनाडूमधील अनेक गावांप्रमाणेच कोट्टापल्लयममध्येदेखिल वीज पोहोचली होती पण वीज पोहोचणे आणि तिचा नियमित पुरवठा होणे या दोन भिन्न बाबी आहेत. अशा या गावात मुरुगम्माने कधीच शेवटची बस पकडण्याचे किंवा आपल्या छोट्या मुलीला रात्री पाणी आणायला बाहेर पाठविण्याचे धाडस केले नसते.
आज मात्र १० फोटोव्होल्टिक (सोलार) क्षमतेच्या सौरदिव्यांनी गावातील रस्ते उजळून निघाले आहेत. हे दिवे वाविपल्लयम पंचायतीच्या मालकीचे असून त्यासाठी पंचायतीला कोणतेही बिल भरावे लागत नाही. गावातल्या कष्टकरी माणसांना त्यांच्या या दिव्यांचा यथोचित अभिमान आहे.
रस्त्यावर दिवे लावणे तसे सोप्पे काम आहे पण या कामाला खास बनविले ते त्यामागच्या अभियानाने! सिंधानई सिर्पिगल या स्थानिक स्वयंसेवी संस्थेच्या सुंदरमूर्ती व सेंथिल अरुमुगन्‍ यांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी ग्रामीण भारतातील लघुउद्योग व दळणवळण उपक्रमांत गुंतवणुक करणार्‍या इन्फ्रासिस या बंगलोरस्थित कंपनीची कोईम्बतूर जिल्हा ग्रामीण विकास संस्थेच्या उत्साही प्रकल्प अधिकारी जयबालाकृष्णन यांच्याशी गाठ घालून दिली.

त्यांनतर झालेला सौदा अगदीच सोपा होता. तामिळनाडू राज्यसरकारने १ लाख रुपयांचे अनुदान देण्याचे मान्य केले. इन्फ्रासिसनेदेखिल तेवढीच रक्कम गुंतवण्याचे ठरविले. ही रक्कम ते पुढील तीन वर्षांत वसूल करणार होते. तीन वर्षांनी या दिव्यांची मालकी वाविपल्लयम ग्रामपंचायतीकडे येणार होती आणि त्यायोगे पंचायतीला त्यानंतरच्या वीस वर्षांत ३ लाख रुपये वाचविता येणार होते.

मात्र लोकशाही पद्धतीनुसार गावकरी व ग्रामपंचायत यांची मंजुरी मिळविणे आवश्यक होते. २८ जानेवारी, २००४ रोजी वाविपल्ल्यमच्या ग्रामसभेमध्ये हा प्रस्ताव मान्य करण्यात आला. त्यानुसार रस्त्यावरील सौरदिव्यांसाठी इन्फ्रासिसबरोबर करार करण्यात आला व फेब्रुवारीत कोईम्बतूर जिल्हा ग्रामीण विकास संस्थेच्या कार्यालयात त्यांच्यावर अंतिम शिक्कामोर्तब झाले. मे, २००४ मध्ये कोईम्बतूर जिल्हा ग्रामीण विकास संस्थेच्या मार्गदर्शनाखाली रस्त्यांवर सौरदिवे बसविण्यात आले.

फेब्रुवारी, २००५ मध्ये रस्त्यांवर बसवलेले हे सौरदिवे रात्री प्रकाश देत होते. तिथल्या रहिवाशांना या दिव्यांचा खूप अभिमान आहे. कारण आता दिव्यांमुळे ते रात्री पायाखालाची वाट पाहू शकतात, समोरून जाणारा सापदेखील पाहू शकतात. मुले आता जास्तवेळ घराबाहेर खेळू शकतात आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे वीजेच्या भारनियमनाचा त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही कारण हे दिवे सौरऊर्जेवर चालतात.

हे दिवे कोणकोणत्या ठिकाणी लावायचे याचा निर्णय लोकशाही पद्धतीने घेतला गेला तरीही काही दिव्यांच्या जागेवरून गावकर्‍यांत थोडी नाराजी आहेच. मात्र दोन जागा अशा आहेत जेथे दिवे बसविण्यास कोणाचेच दुमत झाले नाही आणि आतादेखील नाही आहे - एक जागा म्हणजे सार्वजनिक नळ आणि दुसरी जागा जेथे दर मंगळवारी गावातील पुरूषांचे दोन स्वयंमदत गट जमतात व आपसात विचारांची देवाणघेवाण करतात. महत्त्वाची बाब म्हणजे हा दिवा लागल्यावरच या दोन्ही गटांची स्थापना झाली आहे.
अशाच प्रकारच्या इतरही अनेक गोष्टी आहेत… भारतातील विविध गावांच्या.

स्त्रोत www.businessworld.in

Comments

Popular posts from this blog

सौर बंब (सोलर वॉटर हिटर ) - शंकासमाधान

सौर पथदिवे

सौर ऊर्जा